न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२४) :- बिहार केडरचे मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखलं जातं. त्यांनी अचानक राजीनामा का दिला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
शिवदीप लांडे मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकात असताना त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. शिवदीप लांडे यांना गुन्हेगारांवर बेधडक कारवाई करण्यासाठी ओळखलं जायचं. अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी यशस्वी छापे टाकण्यात आले होते.
दरम्यान, शिवदीप लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळ महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी शिवदीप लांडे यांची बिहारमधील पूर्णियामध्ये आयजी पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
















