न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२४) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक कामकाजासाठी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्त्ती करण्यात आली असून, आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांचे नुकतेच पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे प्रशिक्षण झाले. महाराष्ट्र राज्य निवडणूक विभागामार्फत हे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. यावेळी पुणे आणि कोकण विभागातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तेथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा कालावधी तीन दिवसांचा होता. अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
विधानसेभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला होता. याअंतर्गत पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यांची प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली असून, त्यानुसार शहरात २१५ लाख ६३ हजार ६४७ मतदारसंख्या झाली आहे.
















