- प्रशासनाने घेतलाय महत्वाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव वार्ताहर (दि. २४ सप्टेंबर २०२४) :- देहू नगरपंचायत हद्दीत खासगी जागेतील सोबत इतरत्रचा आठवडे बाजार सायंकाळी सहा वाजता बंद करण्यात येणार आहे. सहा वाजता बाजार बंद न केल्यास नगरपंचायत प्रशासन कडक कारवाई करेल, असा इशारा मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला.
देहूत रात्री उशिरापर्यंत आठवडे बाजार सुरू असतो. बाजार संपल्यानंतर व्यापारी उर्वरित खराब भाजीपाला, कचरा रस्त्यावरच टाकून निघून जातात. यामुळे नागरिकांच्या दारात दुर्गंधी पसरते. तसेच डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आदी आजार बळावत चालले असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी नगरपंचायत प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने खाजगी जागेतील आठवडे बाजारासह इतरत्र भरणारा सर्व आठवडे बाजार सायंकाळी सहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्याधिकारी घार्गे यांसह कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, नगररचना अधिकारी सुरेंद्र आंधळे, शहर समन्वयक अक्षय रोकडे, अविनाश शेलूरकर, गटनेता योगेश परंडवाल आदी यावेळी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांना भरावा लागणार दंड…
आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांनी खराब भाजीपाला, कचरा रस्त्यावर टाकू नये. प्लॅस्टिकचा वापर केल्यास २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल. वेळेत दुकाने बंद न केल्यास कारवाई करण्याचा इशारा विक्रेत्यांना देण्यात आला आहे. याबाबत शहरात दवंडी पिटवून माहिती देण्यात आली होती. वर्दळीच्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, नागरिकांच्या दारात पडणारा खराब भाजीपाला, डासांचा वाढता प्रादुर्भाव आदी समस्यांमुळे आठवड्यातून एकदा शुक्रवारी बाजार भरविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी घार्गे यांनी दिली.
















