न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरातील तलाठी कार्यालयात दहा तलाठ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे तलाठी कार्यालयात विविध कामांसाठी हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत एकूण ३१ तलाठी कार्यालयांचा समावेश होतो. याठिकाणी आतापर्यंत केवळ आठ तलाठी कार्यरत होते. आठ तलाठ्यांवरच इतर कार्यालयाच्या कामकाजाचा अतिरिक्त भार पडला होता. एका तलाठ्यावर त्याच मंडलातील इतर तलाठी कार्यालयाचा पदभार दिला होता.
त्यामुळे अवघे काही तासच तलाठी उपलब्ध होत होते. त्यामुळे, पिंपरी चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत तलाठ्यांची संख्या अपुरी असल्याची नेहमीच ओरड होत होती.
चिंचवड, निगडी, देहू, भोसरी आणि मोशी या चार मंडल कार्यालयांतर्गत तलाठी संख्या अगदी मोजकी होती. त्यातच चिंचवड, भोसरी येथील लोकसंख्या मोठी असल्याने नागरिकांची कामे होत नव्हती. देहू येथील तलाठी कार्यालय केवळ अधिकारी नसल्याने अनेक दिवस बंद होते; तर चिंचवड, आकुर्डी, रहाटणी, चिखली यासारखी काही कार्यालये दुपारनंतर बंद ठेवावी लागत होती. नव्याने रुजू झालेल्या तलाठ्यांची त्या ठिकाणी नेमणूक झाली आहे.
















