न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करू नका. परत आम्हीच निवडून येणार आहोत. निवडून आल्यानंतर बघून घेऊ,’ अशा धमक्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडून महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी ‘नोकरी बचाव’ची भूमिका घेत अशा बांधकामांना फक्त नोटिसाच देऊन समाधान मानत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले.
महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव वाढले आहे. शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाईची आवश्यकता असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मात्र अशा बांधकामांना फक्त नोटीस बजावतात. नोटीस बजावल्यावर काही राजकीय मंडळी अधिकाऱ्यांना थेट धमकी देत आहेत.
प्रशासन काळात शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच पत्राशेड व इतर बांधकामांवर कारवाई अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना होती. मात्र, प्रशासन काळातही महापालिकेत राजकीय वर्चस्व दिसून आले. काही मोजक्याच घरांना नोटिसा देण्यात आल्या. काही बांधकामे व टपऱ्या पाडण्यात आल्या, मात्र, काही दिवसांनंतर जैसे थे परिस्थिती राहिली. काही राजकीय नेते थेट अधिकाऱ्यांना धारेवर धरत बांधकामे न पाडण्याची तंबीच देत आहेत.
विधासनभा निवडणुका आल्या आहेत. आमच्या मतदारसंघात कारवाई करू नका. आम्हाला प्रचारात त्रास झाला तर निवडून आल्यावर तुम्हालाही त्रास होईल, असा दम काही नेतेमंडळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भरत आहेत. त्यामुळे अधिकारीही दबावात आहेत. विधानसभेच्या तोंडावर कारवाई नको, अशी भूमिका ते घेत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी विभागाची कारवाई सुरळीत सुरू आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्याचे आणखी ऐकिवात नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोण दमदाटी करत असेल तर त्यांनी वरिष्ठांना कळवावे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– मनोज लोणकर, उपायुक्त, महापालिका…
















