न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२४) :- राज्यात २८ सप्टेंबर २०२४ रोजी १७ वा माहिती अधिकार दिन सर्व शासकीय कार्यालयात साजरा होणे अपेक्षित आहे. मागील प्रशासकीय कारभाराच्या अडीच वर्षाच्या कालखंडात आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती अधिकाराबाबत प्रशासनाला कडक निर्देश न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे माहिती अधिकार अर्ज प्रलंबित आहेत, सारथी पोर्टल वरचे हजारो अर्ज हे दुर्लक्षित आहेत. माहिती अधिकाराबाबत प्रशासन अजूनही गतिमान नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात अर्ज हे प्रलंबित आहेत. सामान्य प्रशासनाने २० सप्टेंबर २००८ साली महत्वाचा जी आर सर्व शासकीय कार्यालयासाठी प्रसिद्ध केला. शासन निर्णय २००८/ ३७८/०८ अन्वये प्रत्येक शासकीय कार्यालयांनी जनजागृती हेतू माहिती अधिकार दिन साजरा करणे क्रमप्राप्त आहे.
माहिती अधिकार हे प्रभावी शस्त्र नागरिकांना त्यांचे प्रश्न शासनापुढे भक्कम मांडण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे, असे असताना बहुतांशी शासकीय कार्यालये माहिती अधिकार दिन साजरा करत नाहीत. आपल्या महापालिकेतही तीच उदासीनता जाणवते. नागरिकांना पूर्ण माहिती आजही माहिती अधिकारात पूर्णपणे देण्यात येत नाही. प्रशासन अतिशय सुस्त पद्धतीने माहिती अधिकार अर्ज निकाली काढत आहेत.
गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात महापालिका प्रशासनाने माहिती अधिकार बाबत कोणतीही प्रभावी “झिरो टॉलरन्स आरटीआय” अंमलबजावणी मोहीम राबवली नाही. त्यामुळे आर टी आय बाबत आयुक्तांचे प्रगती पुस्तक कोरे समजावे लागेल. त्यामुळे २८ सप्टेंबर बाबत प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलून सर्व ६० पेक्षा जास्त कार्यालयांमध्ये जागतिक माहीती अधिकार दिन साजरा होणे महत्वाचे.












