न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मुळशी तालुक्यात हिंजवडी आणि हवेली तालुक्यातील मांजरी भागातील अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. तत्पूर्वी संबंधितांना अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र, नोटीसचे अनुपालन न केल्याने दोघांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली.
श्रीकांत भानुदास नवले (रा. हिंजवडी) यांच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात दीपाली विजय भाडाळे (रा. हडपसर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमताधारकांनी परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात आले आहे. यासह सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत. अन्यथा संबंधितांवरही कारवाई करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन मस्के, रवींद्र रांजणे यांनी कारवाई केली.
पहिल्यांदाच नोंदवला या कलमांन्वये गुन्हा…
या तरतुदीच्या अनुषंगाने अनधिकृत बांधकामधारकांवर पहिल्यांदाच या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ नुसार अनधिकृत बांधकामधारकास अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस दिल्यानंतर अनधिकृत बांधकाम न थांबविल्यास तीन वर्षापर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.
संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी नोटीसद्वारे कळवले होते. मात्र, त्यांनी नोटीसचे अनुपालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५४(२) अन्वये हिंजवडी आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
– डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभाग, पीएमआरडीए…