- दोन मातब्बर नेतेही ऐनवेळी पवार गटात जाण्याची शक्यता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२४) :- एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहरावर वर्चस्व असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना राजकीय धक्के दिल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शहराच्या राजकारणावर विशेष लक्ष घातले आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांचा ओढा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वाढला आहे. पहिल्यांदाच शरद पवारांनी स्वतः पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखली मंगळवारी (दि. ८) पुण्यात घेतल्या.
पुण्यातील गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालय येथे मंगळवारी सायंकाळी या मुलाखती झाल्या. यावेळी खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, फौजिया खान, आमदार रोहित पवार, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार जयदेव गायकवाड व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळावेत, असा ठराव शहर संघटनेने केला आहे.
दरम्यान पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी नगरसेविका सुलक्षणा धर, शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयुर जाधव, विशाल ऊर्फ साकी गायकवाड, शहर सरचिटणीस सचिन गायकवाड आणि प्रफुल्ला मोतलिंग या इच्छुकांनी मुलाखत दिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी शहराध्यक्ष तुषार कामठे, डॉ. अमर देशमुख आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, दत्तात्रय जगताप यांनी मुलाखत दिली.
तसेच माजी आमदार विलास लांडेही शरद पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावित शरद पवारांची भेट घेतली. चिंचवडची जागा पक्षाला न मिळाल्यास महाविकास आघाडीत प्रवेश करण्याचा इशारा दिला. या माजी नगरसेवकांसाेबत भाजपमधील नाराजांचा एक माेठा गट आहे. लाेकसभा निवडणुकीत तटस्थ राहिलेले आणि विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाम असलेल्या माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आणि पिंपरीतून इच्छुक असलेल्या एका माजी नगरसेविकेने शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते.