न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे.
सहा विधानसभानिहाय होणा-या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार एकूण १८२ फेऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक ४२ फेऱ्या पनवेल आणि सर्वात कमी २५ फे-या उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांत होणार आहेत.
मावळ लोकसभेसाठी २९ एप्रिलला मतदान झाले आहे. एकूण २२ लाख ९७ हजार ४०५ मतदारांपैकी १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदान केले. हे प्रमाण ५९.४९ टक्के आहे. या मतांची मोजणी क्रीडानगरीत केली जाणार आहे. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी असा सहा विधानसभानिहाय वेगवेगळी मात्र, एकाच वेळी सकाळी आठला मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे.
प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल तयार करण्यात आले आहेत. सर्व टेबलवरील मोजणी पूर्ण झाल्यानंतरच दुसरी फेरी सुरू केली जाणार आहे. पनवेल सोडल्यास सर्व मतदारसंघाच्या फे-या ३५ च्या आत आहेत. मात्र, पनवेलच्या ४२ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजले जाणार आहे. त्यास अधिक वेळ जाणार आहे.











