न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या एका हॉटेल व दुकानावर कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड (गुरुवारी) वसूल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे प्लास्टिक बंदीवरील कारवाई थंडावली होती. परंतु, महापालिकेने पुन्हा बडगा उगारला आहे. महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर यांच्यासह ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली.
वॉर्ड क्रमांक १८ मधील बे लिफ बिस्रो हाँटेल व गणेश हार्डवेअर येथे प्लास्टिकचा साठा आढळून आला. प्रतिबंधित असलेल्या प्लास्टिक पिशव्या, चमचे, डबे असा एकूण सुमारे ६ किलो वजनाचा माल जप्त करण्यात आला. हॉटेल व दुकानाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात करण्यात आला. महापालिकेकडून कारवाई सुरूच राहणार असून, प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.











