- प्रतिनियुक्तीवरील सहाय्यक आयुक्त सुचिता पानसरे पालिका सेवेत रुजू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त सुचिता पानसरे यांची राज्याच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव पनवेल महापालिकेत बदली केली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी मॅटकडे दाद मागितल्याने या बदलीला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पानसरे यांना पुन्हा महापालिका सेवेत रुजू करून घेतले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तसे आदेश काढले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या चार सहाय्यक आयुक्तांच्या नगरविकास विभागाने एकाचदिवशी (दि. २० सप्टेंबर) राज्यातील अन्य महापालिकांमध्ये बदल्या केल्या होत्या यामध्ये सहाय्यक आयुक्त विनोद जळक यांची सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी, नीलेश देशमुख यांची कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी, प्रशासन अधिकारी अंकुश जाधव यांची नवी मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी तर प्रशासन अधिकारी सुचिता पानसरे यांची पनवेल महापापलिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली होती.
सुचिता पानसरे यांनी बदलीच्या या निर्णयाविरोधात मॅटकडे दाद मागितली होती. त्यानुसार मॅटने पानसरे यांच्या बदलीला अंतरिम स्थगिती दिली. याबाबतचे आदेश प्राप्त होताच पिंपरी चिंचवड महापालिकेत पानसरे यांना पुन्हा रुजू करुन घेण्यात आले. त्यांच्या अस्थापनाविषयक बाबी समाजविकास विभागाकडे असणार असून, महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलव व पुनर्वसन विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.
















