न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ मौजे भोसरी येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गृहप्रकल्प एक आणि दोनमधील सदनिकाधारकांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधितांसह प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदाराची संयुक्त बैठक घेत तातडीने दोषमुक्त कामे करण्याचे निर्देश दिले. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदार यांच्यावर निविदेतील अटी शर्तीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
पेठ क्रमांक १२ भोसरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प एक आणि दोनमध्ये सदनिकांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या सदनिकाधारकांनी काही दिवसापूर्वी पीएमआरडीएकडे सदनिकेतील बाथरूम, टॉयलेट, टेरेस, सोलर वाटर लाइन, ड्रेनेज लाइन या सुविधांबाबत
तक्रारी मांडल्या होत्या. त्यानुसार महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी (दि. १०) सदनिकाधारक, लोकप्रतिनिधी, प्राधिकरणाचे अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि संबंधित ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेत अडचणी जाणून घेतल्या. यात गृह प्रकल्पाच्या कामातील आढळून आलेले दोष, तक्रारी तातडीने निराकरण करण्यासाठी पुढील एका महिन्यात मुदत संबंधितांना देण्यात आली.
संबंधित गृह प्रकल्प कामाच्या गुणवत्तेबाबत त्रयस्त संस्थेकडून तपासणी करून घेत प्रमाणपत्र घ्यावे. तर कामातील संथगती व नेमून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास त्यांच्यावर निविदा प्रक्रियेतील अटी शर्तीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
















