- आरटीओकडून तपासणी केवळ २८० वाहनांचीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शालेय वाहतूक करणाऱ्या २८० बसची तपासणी केली. यात १७१ बसचालकांनी मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या बसचालकांवर ‘आरटीओ कडून कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात २,९५७ स्कूल बसची नोंदणी आहे. बसव्यतिरिक्त व्हॅन आणि रिक्षांमधूनही शालेय विद्यार्याची वाहतूक केली जाते. पुणे शहरात मागच्या आठवड्यात शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाकडूनच दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. या घटनेनंतर पुन्हा शहरातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागामार्फत १ एप्रिल ते ३१ ऑगस्टदरम्यान शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये एकूण २८० प्रवासी बसची तपासणी केली. यात बसचालकांकडून विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये
बेकायदेशीर फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे, कर न भरणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७१ वाहनांवर आरटीओच्या सात वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली. मात्र शहरात तीन हजार शालेय वाहतूक करणारी वाहने असताना केवळ २८० वाहनांचीच तपासणी कशी, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
- आरटीओकडून शहरातील विविध भागात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यात ऑगस्टपर्यंत १७१ वाहने टोची आढळली. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड…
















