- भयानक रस्त्यामुळे तीर्थक्षेत्र येलवाडीगावच वैभवच मिळालं धुळीस?..
- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा रोष होऊ शकतो मतपेटीत व्यक्त ?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी दिल्यानंतरही देहूगावाशी जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर पावलोपावली खड्डे पडलेले दिसत आहेत. पावसाळ्या अगोदर केलेले डांबरीकरण पाण्यात गेले. स्थानिकांसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांबरोबरच संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भक्तमंडळीनाही खड्ड्यांमुळे धक्क्यावर धक्के खातच या संतनगरीत यावे लागत आहे.

देहूगावात येण्यासाठी असलेल्या पाच प्रमुख मार्गापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र देहूगाव ते येलवाडी फाटा रस्त्याची झालेली दुरवस्था आणि येलवाडीगाव ते देहूगाव आणि पुढे देहफाटा या रस्त्याची चाळण, रस्त्यावर पडलेले मोठाले खड्डे यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा सहन करावा लागत आहे.

चाकण एमआयडीसीकडून ये-जा करणारी वाहने, मालवाहू ट्रक, कामगारांच्या बस, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस यामधील प्रवाशांना तासंतास उशीर होत आहे. शुक्रवारी, शनिवारी दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे कामगार, शेतकरी, दूध व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. भाविक भक्तांची वाहनेदेखील या वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा..
देहुगाव ते येलवाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तो अपघाताला निमंत्रण देणारा झाला आहे. एखादी मोठी दुर्दैवी घटना घडून लोकांचे बळी गेल्यावर पीएमआरडीए आणि संबंधित यंत्रणांना जाग येणार का?, असा सवाल त्रस्त नागरिकांनी केला आहे. संबंधितांनी या रस्त्याचे काम लवकर सुरू न केल्यास खड्ड्यांत बसून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा येलवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच अपयश?..
खेड तालुक्यातील विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या दुर्लक्षामुळे तीर्थक्षेत्र देहूगाव ते येलवाडी आणि चाकण-तळेगाव महामार्गाला जोडणाऱ्या देहूफाट्यापर्यंत हा रस्ता उखडला आहे. पीएमआरडीएच्या कार्यकक्षात येणाऱ्या या महत्वाच्या रस्त्याबाबत आ. मोहिते पाटलांनी अधिकाऱ्यांसोबत साधी बैठक देखील घेतली नाही. त्यामुळे नागरीकांचा नाराजीचा मोठा सूर आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग औद्योगिकनगरी चाकणकडे ये-जा करीत असतो. पावसाळ्यात तर, वाहनचालकांना इथे रस्ताच दिसत नाही. तो पाण्याखाली असतो. अपघात पाचवीला पुजलेले. मोठ मोठे जीवघेणे खड्डे, धुराळा यामुळे येथील नागरिकांना श्वसनाचे आजारही बळावू लागले आहेत. तीर्थक्षेत्र असणाऱ्या येलवाडीगावच वैभवच या भयानक रस्त्यामुळे धुळीस मिळू पाहत आहे की काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. याला जबाबदार स्थानिक आमदार आणि पीएमआरडीए प्रशासन आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा रोष मतपेटीत व्यक्त होऊ शकतो, अशी परिसरात खाजगीत कुजबुज सुरु आहे.
















