न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- लोकसभेत पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिपाणी चिन्हं गोठवण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्हावर बंदीची मागणी फेटाळली आहे. विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हावर बंदी नसणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा पुन्हा तुतारीला फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवारांनी हजारो मते घेतल्याने याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. यानंतर शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत पिपाणी चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी केली होती.
यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे? या प्रश्नावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेतील चिन्हांचा गोंधळ पाहता शरद पवारांच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, शरदचंद्र पवार पक्षाने तीन मागण्या केल्या होत्या त्यातील दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची चिन्ह मोठं करण्याची मागणी मान्य केली आहे. या मागणीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला लिखित स्वरूपात विचारले होते. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे. शरद पवार गटाची पिपाणी चिन्ह गोठवण्याबाबतची मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केली आहे. आयोगाने म्हटले की पिपाणी हे चिन्ह पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे त्याला आम्ही हात लावला नाही. ही मागणी अमान्य झाल्यामुळे शरद पवार गटाला विधानसभेलाही ट्रम्पेटचा सामना करावा लागणार आहे. लोकसभेला पिपाणी चिन्हावरील अनेक उमेदवारांना पवारांनी लढवलेल्या मतदारसंघात लक्षणीय मतदान झाले होते. साताऱ्यात तर केवळ पिपाणी चिन्हाला झालेल्या मतांमुळे शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.
















