- ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार..
- प्रचारासाठी मिळणार केवळ १३ दिवसांचा कालावधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यात शनिवार, रविवार अशा दोन सुट्या आल्याने अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सहा दिवस मिळणार आहेत. त्यामुळे २८ व २९ ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रचारासाठी १३ दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. दि. २८ रोजी चौथा शनिवार, तर दि. २९ रोजी रविवार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ सहा दिवस मिळतील. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, त्याच दिवशी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. शिवाय, त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतरच निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, त्यापूर्वी १८ नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यामुळेच प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १३ दिवस मिळणार आहेत.
मावळ मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. गावोगावी पोहचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच शहर परिसरातील तिन्ही मतदारसंघ मोठे आहेत. मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच या कालावधीत जाहीर सभाही मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यासाठी वेळ कमी मिळणार आहे. त्यातच पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये राज्यभरातील नागरिक नोकरी आणि व्यवसायासाठी आले आहेत. ते दिवाळी सणासाठी गावाकडे आणार आहेत. त्यांच्याशी संपर्क करणे कठीण जाणार आहे.
आगामी २० नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत दिवसभरात आठ-दहा बैठका घेतल्या जात आहेत. निवडणुका शांततापूर्ण पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.











