- विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंच टेन्शन वाढलं?..
- अजित पवारांच्या नेमकं मनात चाललंय तरी काय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२४) :- विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे मतदारसंघातील दौरे सुरु असून मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला जात आहे. कारण ही विधानसभेची निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. आता निवडणूक जाहीर होताच पिंपरी विधानसभा मतदारसंघातही घडामोडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी विधानसभेसाठी भाजपचे राजेश पिल्ले हे प्रबळ इच्छूक आहेत. त्यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या नेमके मनात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष योगेश बहल यांचे ते कट्टर समर्थक होते. गटबाजीच्या राजकारणातून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. महापालिकेत २००७-१२ या कालावधीत पिल्ले राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. त्यांनी क्रीडा समितीचे सभापतीपदही उपभोगले आहे. आता ते अजित पवार गटाकडून पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमोर पिल्ले यांचं आव्हान निर्माण झाल आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातही उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे आहे. अण्णा बनसोडे हे येथील विद्यमान आमदार आहेत. मात्र, या मतदारसंघामध्ये महायुतीमधील अजूनही काही नेते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. काहींनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसही या मतदारसंघांवर दावा करत आहे. इतकंच काय तर काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या आहेत. यामध्ये अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे पिंपरीमध्येही राजकारण तापलं आहे.
पिंपरी विधानसभेचं प्रतिनिधित्व अण्णा बनसोडे करत आहेत. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता. पिंपरी मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आता महायुतीत विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला असल्यांचं नेते सांगतात. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार उमेदवारी मिळणार का? की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार? हे निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देते? महाविकास आघाडीला की महायुतील? या निवडणुकीत कोण बाजी मारतं? हे आता पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
मतदारांची संख्या…
पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे येथून निवडून आले होते. अण्णा बनसोडे यांना ८६,९८५ मतदान मिळाले होते, तर गौतम चाबुकस्वार यांना ६७,१७७ मतदान झालं होतं. या निवडणुकीत अण्णा बनसोडे हे विजयी झाले होते, तर गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाला होता. दरम्यान, सध्या पिंपरी विधानसभा मतदारांची एकूण संख्या ३ लाख ६४ हजार ८०६ एवढी आहे.











