न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील १६ लाख ३४ हजार ७६८ मतदारांसाठी १४४२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच सध्या विविध आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना विधानसभेच्या कामकाजांचे वाटप करण्याचे काम सुरू आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील कामकाजाला सुरुवात झाली नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील तिन्ही विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम झाली आहे. मतदानाची केंद्रेही निश्चित आहेत. तसेच तिन्ही मतदारसंघांतील मतदान यंत्रे ठेवण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. मतदान यंत्रे आली की त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मतदानाच्या दृष्टीने आवश्यक तयारी झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडून इतर विभागातील ५० टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामांसाठी वर्ग करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्त्या पूर्ण झाल्या की कामकाजाला सुरुवात होईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता, फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, महरा, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजील, केवायसी, सुविधा पोर्टल आदी संगणकीय व्यवस्था, उपयोजके (अॅप्लिकेशन्स) यांची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच मतदारसंघात एक महिला, दिव्यांग, युवा संचलित, संकल्पना आधारित विशेष मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.
– रेवणनाथ लबडे, निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विधानसभा मतदारसंघ…











