न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२४० :- विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीपासून सवलत दिली आहे, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी काढले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक यंत्रणेला मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यात पिंपरी- चिंचवड महापालिका आस्थापनेवर वर्ग एक ते वर्ग चार असे सुमारे आठ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी रुजू झाले आहेत.
निवडणूक कामकाजासाठी ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत, त्यांना निवडणूक काळात बायोमेट्रिक हजेरीतून (फेस रिकग्निशन) सूट देण्यात येणार आहे. परंतु, या कामकाजानंतर पुन्हा नियमितपणे बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी काढले आहेत.












