- आ. महेश लांडगे यांच्या प्रचारापासून शिवसेना उपनेते इरफान सय्यद अलिप्त?..
- त्यांच्या नाराजीचे ‘डॅमेज कंट्रोल’ भाजपसह पक्षश्रेष्ठी कसे करणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 27 ऑक्टोबर 2024) :- भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. वाटाघाटीत महायुतीचा घटक पक्ष भाजपाला ही जागा सोडण्यात आली आहे. भाजपकडून विद्यमान आमदार महेश लांडगे यांना पक्षाकडून पुन्हा अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने आ. महेश लांडगे यांच्याकडून भोसरी मतदार संघात प्रचार सुरु आहे. या प्रचारापासून सध्यातरी महायुतीचा घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) कोसो दूर आहे. शिवसैनिकही प्रचारात सक्रीय नाहीत. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन घटक पक्षांमध्ये काहीतरी बिनसले आहे? असा सवाल राजकीय जाणकारांकडून उपस्थित होताना दिसतो आहे.
या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची ताकद तसेच कामगार नेते आणि अल्पसंख्याकांचा चेहरा शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांचा मोठा ‘होल्ड’ आहे. त्यांचा शिरूर लोकसभा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. खेड, आळंदी, जुन्नर, शिरूर, भोसरी या भागातील शिवसैनिकांवर त्यांची मजबूत पकड आहे. त्यांची हक्काची अशी ‘व्होटबँक’ सुद्धा आहे. तरीही ते आ. लांडगे यांच्या प्रचारापासून का अलिप्त आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. गत २०१९ सालच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी भाजपचे इमानेइतबारे काम केल्यामुळेच भोसरीत आ. लांडगे यांचा विजय सुकर झाला होता. आ. महेश लांडगे यांच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा होता. त्यानंतर झालेल्या २०१९ सालच्या निवडणुकीत इरफान सय्यद यांनी भोसरी विधानसभेत शड्डू ठोकला होता. भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी त्यांना तसा शब्दही दिला होता. मात्र, जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. आ. महेश लांडगे हेच त्यावेळी भाजपचे उमेदवार होते. इरफान सय्यद यांनी पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून महेश लांडगे यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. असे असताना आ. महेश लांडगे यांच्या प्रचारापासून आज ते दूर आहेत. इरफान सय्यद यांच्या नाराजीचे डॅमेज कंट्रोल करून त्यांना प्रचारात सक्रीय करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आ. महेश लांडगे यांच्या मतांच्या बेरजेच्या गणितात मोठी घट होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
”भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील बहुसंख्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाशी घरोबा केला आहे. त्यामुळे या मतदार संघात महायुतीतील अजित पवार गटाची ताकद क्षीण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे निर्णायक बहुमतासाठी आ. महेश लांडगे यांना सर्वस्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटावर अवलंबून रहावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इरफान सय्यद यांचे निकटचे संबंध सर्वश्रुत आहेतच. शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या पडझडीत बहुतांशी शिवसैनिक हा शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. ते म्हणतील तीच पूर्वदिशा मानणारा येथील शिवसैनिक आहे. कामगार नेता म्हणुन त्यांच्याशी थेट ‘कनेक्टेड’ असणारा बहुसंख्य कामगार वर्ग आणि सर्वसमावेशक अल्पसंख्यांक चेहरा, अशी त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांची नाराजगी दूर होणे आ. महेश लांडगे यांच्या फायद्याचा सौदा आहे. अन्यथा भोसरी मतदारसंघात आ. महेश लांडगे यांना मतांचा दगाफटका सहन करावा लागू शकतो.”
- ‘याबाबत न्यूज पीसीएमसीच्या प्रतिनिधीने शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे ते या निवडणुकीपुरते राजकीय विजनवासात तर गेले नाहीत ना? असा सवाल उपस्थित होत आहे’.











