- यंदाही राहुल कलाटे नावाचं वादळ घोंघावणार..
- राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर..
- अजित पवार गटाचे नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांचीही बंडखोरी..
- दोघेही अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२४) :- विलक्षण नाट्यमय घडामोडी, नेत्यांचे धक्कातंत्र आणि अनाकलनीय राजकीय डावपेचांचा इतिहास असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात यंदाही राहुल कलाटे नावाचं वादळ चिंचवड विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत. त्यांना अनपेक्षितपणे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, पोटनिवडणुकीतील पराभूत उमेदवार नाना काटे यांनी अपक्ष लढण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणुकीचीच पुनरावृत्ती होणार आहे. तर, दुसरीकडे अजित पवार गटाचे भाऊसाहेब भोईर हे देखील अपक्ष अर्ज भरून आपले नशीब आजमावणार आहेत. महायुतीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपला गेली आहे. शंकर जगताप हे भाजपचे उमेदवार आहेत.
मत विभाजनाची काटामारी आणि सोयीस्कर कोलांटउड्यांत माहीर असलेल्या कलाटेंना महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे ते यंदाही अदृश्य शक्तीच्या इशाऱ्यावर अपक्ष म्हणून अर्ज भरतील, असे चित्र होते. मात्र, घडले विलक्षणच. पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय नेत्यांच्या कोलांटउड्या आणि सोयीस्कर पक्ष बदलण्याची भूमिका नेहमीच पाहायला मिळते. लाखांवर मतदार असून, गेली पंधरा वर्षे जगताप परिवाराचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. लक्ष्मण जगताप यांनी सलग तीन वेळा बाजी मारली, तर त्यांच्या निधनानंतर २०२३ मधील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. आता लक्ष्मण जगताप यांचे बंधू तथा भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सुरुवातीपासून लक्ष्मण जगताप यांच्यासोबत असलेल्या राहुल कलाटेंनी २००९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याशी फारकत घेतली. २०१४, २०१९, २०२३ या तिन्ही निवडणुकांत ते जगताप घराण्याच्या विरोधात निवडणुकीत उतरले. मात्र, तिन्ही वेळा त्यांना अस्मान दाखवले गेले.
निवडणुकीत लढण्यासाठी नाही, तर मत विभाजन करून ठरवलेल्या सावजाला पाडण्यासाठी ते उभे राहत असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी, शिवसेना ते पुन्हा राष्ट्रवादी असा त्यांचा प्रवास झाला आहे. यादरम्यान त्यांनी शिंदेसेनेशीही हातमिळवणी केली होती. पोटनिवडणुकीत मत विभागणी करण्यासाठी ते उभे राहिल्याचे सांगितले गेले. त्यावेळी त्यांच्यामागे असणारी अदृश्य शक्ती आताही त्यांना इशारा करत होती. त्यामुळे ते महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार ठरले आहेत. धरसोड वृत्तीमुळे त्यांना उमेदवारी देण्यास ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते इच्छुक नसल्याचे चित्र होते. तिकीट मिळाले नाही तर कलाटे ‘वाटाघाटी’ करून अपक्ष म्हणून अर्ज भरतील, असाही अंदाज वर्तवला जात होता. मात्र, ते आता खरोखरच उमेदवारीसाठी चिंचवडचा ‘डॉर्क हॉर्स’ ठरले, असे म्हणायला वावगे ठरू नये.
राहुल कलाटे यांनी २००२ ची महापालिका निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. नंतर ते शिवसेनेत गेले. शिवसेनेने त्यांच्यावर शहरप्रमुखपदाची जबाबदारी दिली. २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेकडून उतरले. २०१९ मध्ये ते राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार होते तर २०२३ मधील पोटनिवडणुकीत ते पुन्हा अपक्ष म्हणून लढले. तिन्ही वेळेस त्यांना पराभूत व्हावे लागले. आता ते शिंदेसेनेसोबत असल्याचे बोलले जात असतानाच शरद पवार गटाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे. शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा त्यांना झाला म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यानंतर संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे प्रचाराला लागले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच शंकर जगताप यांचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसूबारस दिनाचा शुभमुहूर्त साधून भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप हे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी निर्धार मेळाव्यात आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला होता. काही झाले तरी लढणारच, असे त्यांनी त्याच वेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर लगोलग प्रचारास लागून त्यांनी प्रचारात आघाडीही घेतली आहे. दरम्यान लढण्याचा निर्धार कायम ठेवत सोमवारी (दि. २७) रोजी ते आपला उमेदवारी अर्ज ग क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नाना काटे हे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. चिंचवड मतदार संघातील कार्यकर्त्याचा मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. सोमवारी (दि. २७) रोजी सकाळी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर पासून सकाळी ९.०० वाजता पदयात्रा काढत रहाटणी मार्गे काळेवाडी मार्गे ग प्रभाग कार्यालय येथे ते अर्ज दाखल करणार आहेत.
आतापर्यंतच्या लढतींत काय झाले?
■ विधानसभेच्या २०१४ मधील लढतीत भाजपच्या लक्ष्मण जगतापांनी १ लाख २३ हजार, तर शिवसेनेच्या कलाटेंनी ६३ हजार आणि राष्ट्रवादीच्या नाना काटेंनी ४२ हजार मते घेतली होती. तेव्हाच्या अपक्ष मोरेश्वर भोंडवेंनी १४ हजार मते खाल्ली होती. २०१९ मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत कलाटेंनी १ लाख १२ मते पदरात पाडून घेतली होती.
■ २०२३ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि राहुल कलाटे इच्छुक होते. शेवटच्या क्षणी काटेंना उमेदवारी मिळाली. त्यांनी ९९ हजार मते घेतली, तर ऐनवेळी अपक्ष म्हणून उतरलेल्या कलाटेंचा टक्का घसरला. त्यांना ४४ हजार मतांवर समाधान मानावे लागले. आता काटे आणि कलाटे पुन्हा आमने सामने आहेत. फरक फक्त भाजपच्या उमेदवारीचा आहेत. त्यावेळी आ. अश्विनी जगताप समोर होत्या आता भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आमने सामने आहेत. त्यात आता भाऊसाहेब भोईर यांनीही उडी घेतली आहे.
त्यामुळे या लढतीला आता २०१४ च्या भोसरी पॅटर्नचे स्वरूप मिळते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज भरणा केल्यानंतर ४ नोव्हेंबरला माघार घेण्याच्या दिवशी याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होईल.











