- भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२४) :- चिंचवडच्या राजकारणात दरदिवशी निरनिराळे गौप्यस्फोट होत आहेत. रविवारी कोणाच्या मनात नसताना राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली तर, आज अचानक भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटे यांच्या निवडीची घोषणा केली आहे.
दरम्यान कालपर्यंत चिंचवडच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे शत्रुघ्न काटे बंडाच्या तयारीत होते. आज अचानक त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्या गळ्यात भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची माळ पडली आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहे.
”पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे.
– मा. शत्रुघ्न काटे, नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष – भाजपा, पिंपरी चिंचवड जिल्हा…”भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष (कार्याध्यक्ष) पदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नियुक्ती पत्राद्वारे शत्रुघ्न काटे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. संघटनात्मक पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष (कार्याध्यक्ष) पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक दृष्टया वाटचाल करणार असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.”