न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चाचे दैनंदिन स्वतंत्र हिशोब ठेवणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या सर्व दैनंदिन खर्चाची नोंद करणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यासाठी पथकाची स्थापना २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात आलेली आहे. उमेदवाराचे निवडणूक खर्च तपासणी अ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय , निगडी प्राधिकरण येथील विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक खर्च निरिक्षक प्रेम प्रकाश मीना (आय.आर.एस.) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
तपासणी तीन टप्प्यात होणार आहे. खर्चाची पहिली तपासणी दिनांक १०/११/२०२४, दुसरी तपासणी दिनांक १४/११/२०२४ आणि तिसरी तपासणी दिनांक १९/११/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.
उमेदवाराकडून निवडणुक खर्चाचा हिशोब वेळेत सादर करण्यात यावा. याची सर्व निवडणुक लढविणा-या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे पिंपरी विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

















