न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- राज्यातील सर्वात मोठा क्रमांक दोनच्या चिंचवड मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात असल्याने तेथे मतदानासाठी २ बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर ताण पडणार आहे. पिंपरी व भोसरी मतदारसंघात १५ व १५ पेक्षा कमी उमेदवार असल्याने एकच बॅलेट युनिट लागणार आहे.
ईव्हीएमला जोडलेल्या बॅलेट युनिटवर जास्तित जास्त १६ उमेदवारांचे नावाच्या पुढे बटण असतात. त्यात एक बटण हे ‘नोटा’चे असते. त्यामुळे एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवारांची नावे बसतात. पिंपरी मतदारसंघात १५ तर, भोसरी मतदारसंघात ११ उमेदवार आहेत. त्यामुळेत या ठिकाणी मतदानाच्या दिवशी एकच बॅलेट युनिट लागणार आहे.
चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एक बॅलेट युनिटवर १५ नावे आणि दुसऱ्या बॅलेट युनिटवर ५ उमेदवार व नोटाचे बटण असणार आहे. प्रत्येक मतदार केंद्रांच्या ईव्हीएमसोबत दोन बॅलेट युनिट जोडली जातात. त्याची चाचणी, हाताळणी, ने-आण आदींमुळे निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडणार आहे.
दरम्यान, प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची संख्या आणि त्यांची चिन्ह निश्चिती झाली आहे. त्यामुळे बॅलेट युनिट (मतपत्रिका) छपाईसाठी पाठविण्यात आल्या आहेत. छपाईनंतर बॅलेट युनिट तयार करण्यास सुरुवात केली जाईल. त्यानुसार कर्मचार्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणही दिले जाईल.

















