न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- डाई ईची कंपनीतून निवृत्त झालेल्या कामगारांना ५० टक्केच रखडलेली देणी देऊ. सन २०११ नंतर निवृत्त झालेल्या कामगारांनाच देणी देण्यात येतील. सन २००८ ते २०११ पर्यंत निवृत्त झालेल्या कामगारांची देणी देणार नाही, अशी भूमिका कंपनी व्यवस्थापनाने घेतली आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या या प्रस्तावाला कामगारांनी विरोध केला आहे. शंभर टक्के देणी देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. डाई ईची कंपनीतील कामगारांच्या रखडलेल्या देण्यांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. रखडली देणी मिळावीत म्हणून कामगार गेल्या सात महिन्यांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारावर गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिका – यांनी दुर्लक्ष केल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली.
न्याय मिळावा म्हणून कामगारांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यानुसार सध्या तरी कंपनीचे स्थलांतर रखडले आहे. मात्र कामगारांच्या देण्याबाबत कंपनी व्यवस्थापन अद्यापही उदासीनच असल्याचे दिसते. न्यायालयात नुकतीच कंपनी व्यवस्थापनाकडून आपली भूमिका मांडण्यात आली. सन २००८ पासून निवृत्त झालेल्या कामगारांना रखडलेली देणी देणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापनाने न्यायालयापुढे मांडली. आमची शंभर टक्के देणी द्या, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. येत्या ७ जून रोजी न्यायालयात या घटनेची सुनावणी होणार असल्याचे आमच्या सूत्रांनी सांगितले आहे.











