- श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव उत्साहात साजरा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. निकाली कुस्तीत संतोष दोरवड़ याने चांदीची गदा व दीड लाखाचे बक्षीस पटकावले. बुधवार (दि. ८) रोजी पहाटे पाच ते सात या वेळेत श्री काळभैरवनाथ महाराजांना अभिषेक व महापूजा करण्यात आली.
रात्री नऊ वाजता श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या पालखीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. गुरुवार (दि. ९) रोजी दुपारी साडेतीन वाजता नव महाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर काळभैरवनाथ चषक कुस्त्याचा आखाडा झाला. कुस्त्यांसाठी सहा लाख रुपये व चांदीची गदा याप्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आले होते. श्री काळभैरवनाथ केसरी किताब संतोष दोरवड याने पटकावला. त्याला दीड लाख रुपये रोख व चांदीची गदा देण्यात आली.
श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव समितीचे मुख्य प्रवर्तक व पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते त्याला पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी संदिप कापसे, उत्सव कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











