न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ११ मे २०१९) :- शहरी भागात नदीलगतच्या भागांमध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करून त्या भागात राहणा-या लोकांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करण्यात यावा. त्याचबरोबर पालिकेच्या हद्दीतील सर्व जून्या पुलाचे व जुन्या इमारतीचे बांधकाम तपासणी (स्टकचरल ऑडिट) पावसाळ्यापुर्वी करून घेण्यात यावे, नदीपात्रातील अतिक्रमणांवर कार्यवाही करावी, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत.
मान्सूनपूर्व तयारी बैठक व जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह पुणे, पिंपरी चिचवड महानगरपालिका प्रशासन व आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. पावसाळ्यात वादळी वा-यासह झाडे उन्मळून पडून मनुष्य व वित्तहानी होऊ नये, यासाठी घोकादायक वृक्षाची छाटणी करावी. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी. नदीपात्रालगत, पात्रातील झोपटपट्ट्या व इतर घोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना ठरवाव्यात. नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढणे तसेच घोकादायक जागांचे सर्वेक्षण करावे. गटार सफाई आणि औषध फवारणी करावी, अशा सूचना काळे यांनी यावेळी दिल्या आहेत.
पुणे हा पूरप्रवण जिल्हा असून पूर परिस्थितीमध्ये आपत्ती घटना घडल्यानंतर रिस्पॉन्स टाईम अर्थात प्रतिसाद कालावधी हा कमीत कमी कसा राहील याची जबाबदारी विभाग प्रमुखांची राहणार आहे. तसेच प्रत्येक विभागांनी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. हा आराखडा ३१ मे पर्यंत जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा. आराखडा सादर न करणाऱ्या विभागांवर कारवाई करण्यात येणार असून, दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्या विभागांना जबाबदार धरले जाणार आहे. तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले.











