- पोलिसांचे उमेदवारांच्या प्रचारावर बारकाईने लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहीर केली आहे. ती २५ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी आयोगाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्यानुसार, रात्री दहानंतर लाऊड स्पीकरवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार व नेत्यांना रात्री दहानंतर स्पीकर चालू ठेवता येणार नाही. तसे केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शहरात स्पीकरद्वारे प्रचार यंत्रणा राबवली जाते. तसेच, सभास्थळी मोठे साउंड लावून उमेदवार व नेत्यांची भाषणे होतात. स्पीकरच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात कोणत्याही वाहनांवर स्पीकर बसवून त्याचा वापर फक्त सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच करता येणार आहे. त्यासाठीही संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार.
स्पीकर आणि वेळेच्या मयदिवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून पथक तयार करण्यात आले आहे. रात्री दहानंतर स्पीकर चालू ठेवल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तसेच, गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे. तक्रारीची वाट न बघता थेट कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंडविधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हा आदेश १५ ऑक्टोबरपासून शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत २५ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मतमोजणी व निकाल २३ नोव्हेंबरला होणार आहे.

















