- इच्छुकांकडून भर प्रचारातच पालिका निवडणुकीसाठी साखरपेरणी..
- नेत्यांकडून तिकीटासाठी घेतला जातोय शब्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीचे रण तापू लागले आहे. प्रचाराने जोर धरला असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. निवडणुकीत उमेदवारी निश्चित करण्यासाठीही ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या अनुषंगाने पक्ष कामाला लागले असून, भेटीगाठींसह मतदारांचे जाळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी प्रारूप आराखडाही प्रसिद्ध झाला होता. मात्र, निवडणुका पुढे ढकलल्या. आता विधानसभा निवडणुकानंतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांनी सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपापल्या प्रभागांमध्ये संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत कोणाला कसा कौल मिळतो, त्यावर अनेकांची राजकीय दिशा निश्चित होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी वातावरण तापणार आहे.
प्रभागातील इच्छुक आणि माजी नगरसेवकांच्या बैठका…
महापालिकेतील माजी नगरसेवक, इच्छुक तसेच पदाधिकारी आता बैठकांवर भर देऊ लागले आहेत. प्रभागातील इच्छुक आणि माजी नगरसेवक विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याने त्यांचे महत्त्वही वाढले आहे. अनेकांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारी निश्चित करण्यासाठीही फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांकडे शब्द टाकायला सुरुवात केली आहे. त्यांना तुमच्या प्रभागातून आपल्या उमेदवारांना चांगले मताधिक्य द्या. त्यांचा प्रचार करण्यासाठी ‘डोअर टू डोअर पोहोचा. त्या कामगिरीवरच तुमच्या तिकिटाचे ठरवू, असा सल्ला नेते देत आहेत.

















