न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुरळा उडत आहे. अलीकडे उमेदवारांच्या स्वागतासाठी जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्याचा ‘ट्रेंड’ आहे. त्यानुसार, उमेदवारांवर पुष्पवृष्टी करणार असेल तर जेसीबीसाठी जास्तीत जास्त १४०० रुपये मोजावे लागणार आहे.
शहरात सध्या निवडणुकीचा ओर वाढला आहे. यासाठी खासगी वाहनांची मागणी जोर धरू लागली आहे. प्रचारासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर वाहनांचा वापर करावा लागतो. उमेदवार जीपचा वापर करत असेल तर प्रति किमी २७ रुपये दराने खर्चाची नोंद करावी लागेल. जर उमेदवार घोड्यावरून प्रचाराला आला तर तासाला एक हजार मोजावे लागतील, घोडागाडीतून आला तर ताशी १३०० रुपये खर्च करू शकतो. उमेदवार व्हॅनिटी व्हॅन घेऊन निघाला असेल, तर प्रतिदिन २५ हजार रुपये खर्च करू शकतो. प्रचाराच्या कालावधीत बाइक रॅली काढताना एका बाइकला ताशी १८ रुपये खर्च करता येणार आहे. त्यानुसार बाइक रैलीमधील सर्व दुचाकी वाहनांचा खर्च ताशी १८ रुपयेप्रमाणे नोंद करावा लागणार आहे.
प्रचारासाठी रुग्णवाहिकेची गरज लागली, तर दोन तासांसाठी २५०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही. टेम्पो, ट्रक, बस, घोडागाडी आदीवर उमेदवार किती रक्कम खर्च करू शकतो, याचे दर निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत. त्यामध्ये २४ तासांसह १०० किमी अंतरासाठी एकूण इंधन, चालक व मदतनिसांवर कमीत कमी २ हजार ४८० रुपयांपासून ते ११ हजार ५०० रुपयांचा दर निश्चित केला आहे. याशिवाय प्रतितासाचे भाडे कमीत कमी १२० रुपये ते ७२० रुपये आणि प्रतिकिमीसाठी १६ ते ६० रुपये दर आकारणी केली आहे. त्यानुसार होणाऱ्या खर्चाची नोंद उमेदवाराला करावी लागणार आहे.
विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराला प्रचारावर तब्बल ४० लाख खर्च करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे या खर्चाच्या रकमेपेक्षा जास्त खर्च होणार नाही, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
















