न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून तळेगाव दाभाडे पोलिसांनी ३७ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. दरम्यान देहूरोड पोलिसांनी देहुगावात मंगळवारी (दि. १२) रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या गाडीतून सव्वातीन लाखाची रोकड जप्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष विवेक वसंत काळोखे (वय ४४, रा. काळोखे मळा, देहूगाव) यांच्यासह सागर निवृत्ती भसे (वय ३९, रा. भीमाशंकर सोसायटी, देहूगाव) यांच्याकडून रोकड जप्त केली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुगावातील चव्हाणनगर येथे दोन जण गाडीतून पैसे घेऊन मतदारांना वाटण्यासाठी आले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीत भसे आणि काळोखे हे दोघे जण होते. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता चालकाच्या आसनाच्या बाजूच्या आसनाखालील एका पिशवीमध्ये तीन लाख २० हजार रूपयांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत काळोखे व भसे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. ही रक्कम कोठून आणली याबाबत काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने रोकड दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. पुढील कारवाईकरिता ही रोकड निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
















