न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांची उद्या बुधवारी (१३ नोव्हेंबर) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. तर, गुरुवारी (१४ नोव्हेंबर) पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड-शो होणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
भोसरीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्राचारार्थ पवार यांची सभा होणार आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार असून पक्षाच्या पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत आणि चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
भोसरीत गव्हाणे आणि भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही सातत्याने शहरात येत आहेत. शरद पवार यांनी महाविकास आघाडीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील जागा पक्षाला घेतल्या आहेत. आता तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. बुधवारी भोसरीत सभा घेणार आहेत. तर, गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचा रोड-शो होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पवार यांचा रोड-शो होणार आहे.
















