- उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग; नेपाळ, चीनशी संधान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२४) :- शेअर मार्केटमध्ये बनावट अॅपद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवुन एकुण ६१,३०,००० रुपयांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या तिघांना उत्तर प्रदेश व छ. संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. सायबर पोलीसांनी दाखल पहिला गुन्हा उघड केला आहे.
याप्रकणी १) अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ऊर्फ कॉम किंग (वय २६ वर्षे व्यवसाय वैदयकीय शिक्षण रा. आनंदनगर मोठया पाण्याचे टाकीजवळ, बैंक कॉलनी नोड, निलंगा जि. लातुर), २) आदाब रुपम शेख ऊर्फ मॅडी (वय २६ वर्षे खोडा कॉलनी, गाझीयाबाद), ३) सतीश भगवान मोरे (वय ३५ वर्षे व्यवसाय आयसीआयसीआय बँक स्वाईप मशिन विक्री रा. सी-१०१, स्वप्न पुर्ती संकुल सोसायटी, पोरवाल रोड, लोहगांव पुणे मुळगांव तांबडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी), अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवीत राहणाऱ्या फिर्यादीने इंटरनेटवर शेअर मार्केट संदर्भात माहीती घेत असताना Mstock या कंपनीच्या शेअर ट्रेडींगच्या जाहीरातीमधील लिंक क्लिक केली. लिंकद्वारे महीलेने फिर्यादी यांना व्हॉट्सअप ग्रुपवर अॅड केले होते. कंपनीच्या ट्रेडींग प्लॅटफॉर्मद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतंवणुक केल्यास २५ ते ३० टक्के प्रॉफिट मिळवुन देण्याचे अमिष दाखवले होते. फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँकेच्या अकाऊंटला एकुण ६१,३०,००० रु. भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी यांना गुतंवणुक केलेली रक्कम तसेच नफा परत न करता रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी यांनी गुन्हयासाठी वापरलेल्या बँक अकाऊंटपैकी एक बँक अकाऊंट हे वाघोली येथील डिलीव्हरी कंपनीमध्ये काम करणा-या इसमाचे असल्याबाबत माहिती मिळाली. इसमाकडे चौकशी करता त्याने सदरचे बँक अंकाउट हे आरोपी अविनाश व सतिश यांच्या सांगण्यावरुन काढले असुन अंकाउट हे संपुर्ण किटसह आरोपी अविनाशकडे दिले असल्याचे त्याने सांगितले. आरोपी हा लोणावळा परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने परिसरातील १००० पेक्षा अधिक व्हिलामध्ये आरोपीचा शोध घेतला असता आरोपी बनावट आधारकार्डचा व वेगवेगळया नावाचा वापर करुन वेगवेगळ्या हॉटेल तसेच व्हिलामध्ये राहत असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. गोल्डन व्हॅली लोणावळा येथील एका व्हिलामधून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यामधुन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन १२, लॅपटॉप ०१, बँक पासबुक किट ०९, एटीएम/डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रोख १,३५,००० रुपये असे एकुण ३,०५,५०० रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी अविनाश हा छ. संभाजीनगर, पुणे शहर परिसरामध्ये वेगवेगळया इसमामार्फत बँक अंकाउट काढुन अंकाउटची माहिती नेपाळ, चीनमधील सायबर गुन्हेगार यांना देवुन व त्यांचेशी संगणमत करुन त्यांनी एकप्रकारे सायबर फ्रॉड करणारी आंतरराष्ट्रीय कंपनीसारखे काम करत होते. कंपनीने दिलेले टोपननाव वापरुन सायबर विश्वामध्ये व इतर आरोपीना आपली ओळख लपवुन संपर्क करत होते. कंपनीने दिलेली जबाबदारी पार पाडत असे. आंतरराष्ट्रीय सायबर आरोपी हे सायबर गुन्हयांची मिटींग काठमांडु, नेपाळ येथे करत असल्याने तपासात दिसुन आले आहे. तसेच अविनाश याच्या संपर्कातील चायना येथील डीके मकाबाका, कॅन्डी कंपनी युझर यांच्याबाबत तपास चालु आहे. आरोपी बाकलीकर हा एका अंकाउटच्या बदल्यामध्ये २-३ लाख रुपये घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी अविनाश ऊर्फ कॉम किंग हा सायबर गुन्हेगार यांचेकडुन पैसे स्वीकारण्यासाठी बायनान्स या प्लॅटफार्मच्या माध्यमातुन युएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी अविनाश याच्या मोबाईल फोनद्वारे एकुण ५५ अंकाउटची माहिती मिळुन आली असुन सदर बँक अंकाउटवर एकुण १५० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त आहेत. तसेच आरोपी अविनाश हा वेगवेगळ्या इसमांना काठमांडु नेपाळ याठिकाणी सायबर गुन्हेगार यांना अंकाउटचे किट घेवुन पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी आदाब शेख ऊर्फ मॅडी हा देखील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात असुन अविनाश हा बँक अंकाउटचे ट्रान्झेंक्शन योग्यरित्या हाताळतो अगर कसे याबाबत वॉच ठेवण्यासाठी गाझियाबाद उत्तर प्रदेश येथुन आल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी सतिश मोरे हा आरोपी अविनाश यांच्याकरिता काम करत असुन सायबर गुन्हयांसाठी लागणारी अंकाउट पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करणे, त्याचेकडे गुन्हा करण्यासाठी वापरलेले बँक अकाउंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार, त्यांचेकडे मिळुन आलेले मुद्देमालाबाबत, त्यांचा अशा प्रकारे किती गुन्हयामध्ये सहभाग आहे, इत्यादीबाबत तपास चालु आहे. रविकिरण नाळे, पोलीस निरिक्षक सायबर सेल अधिक तपास करत आहेत.
नागरीकांना आवाहन…
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशनचा वापर करावा. शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशन हे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बँक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.
















