न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांना वोटर स्लिप वाटपास निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून घरोघरी जाऊन वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रांवर आहे, हे समजणार आहे. त्यामुळे मतदारांची २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधण्यासाठी धावाधाव होणार नाही.
शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या मोठी आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन व्होटर स्लिप तसेच, मतदार मार्गदर्शिकचे वाटप केले जाते.
पिंपरी मतदारसंघात ३ लाख ९१ हजार ६०७. मतदार आहेत. चिंचवडमध्ये ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. तर, भोसरी मतदारसंघात ६ लाख ८ हजार ४२५ मतदार आहेत. या मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक निर्णयअधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व्होटर स्लिप तसेच, मतदार मार्गदर्शिकेचे वाटप करीत आहेत.
चिंचवड मतदारसंघासाठी सुमारे १ लाख ७० हजार मतदार मार्गदर्शिका आणि ६ लाख ६३ हजार ६२२ व्होटर स्लिपा प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत ६८८ मतदार मार्गदर्शिका आणि २ हजार २३० व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. व्होटर स्लिपमध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रूम क्रमांक आदी आवश्यक माहिती आहे.
मतदार मार्गदर्शिकिमध्ये घटनात्मक व कायदेशीर तरतुदी, नाव नोंदणी प्रक्रिया, अर्ज भरण्याची प्रक्रिया, दिव्यांग मतदारांसाठी सूचना, मतदान केंद्रांवरील चिन्हांचे फलक व त्यांचे अर्थ, मतदान प्रक्रिया, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी, निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सुविधा, ईव्हीएमद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया, होम वोटिंग सुविधा, व्होटर हेल्पलाइन अॅप आदींची माहिती देण्यात आली आहे.
चिंचवड मतदारसंघात ५६१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांच्या घरी जाऊन वोटर स्लिप व मतदार मार्गदर्शिकिचे वाटप केले जात आहे. नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही केले जात आहे. प्रामुख्याने नवमतदारांना मतदार वोटर स्लिप वाटप करण्यावर भर दिला जात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.
















