न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी,चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात पहिल्यांदाच “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऐतिहासिक दुर्मिळ कार व बाईक्स पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवारी सायंकाळी संत तुकारामनगर येथील एच.ए. मैदानावर विंटेज कार आणि बाईक्स चे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी कार व बाईक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, रमेश डाळिंबे, देवेंद्र मोरे, अॅड अनंत पाटील, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, श्रेयश जाधव, पियुष घसिंग, सचिन महाज, महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह विंटेज कार व बाईकधारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कोकणे चौक पिंपळे सौदागर येथून या विंटेज कार व बाईक रॅलीची सुरुवात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून करण्यात आली. या रॅलीचा समारोप एच.ए.मैदानावर झाला व प्रदर्शनाला सुरुवात झाली. विंटेज कार व बाईक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याचे चित्र पाहायला मिळाले. तत्पूर्वी, जीएनडी ग्रुपच्या कलाकारांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि ज्येष्ठ कलाकारांनी मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी मतदान करण्याबाबत शपथ घेतली.
















