न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, लोकमान्य हॉस्पिटल्स, भावसार व्हिजन, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, रोशनी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य मित्र’ या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, रुग्णालय आणि डॉक्टर यांच्यामधील समन्वयक म्हणून हा आरोग्य मित्र काम करणार आहे.
आरोग्य मित्रच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात रविवारी (दि. १२) रोजी झाली आहे. निगडी प्राधिकरणमधील सिटी प्राईड स्कूल येथे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले. हे प्रशिक्षण शिबीर तीन तासांचे आहे. प्रत्येक आठवड्याला दोन तास प्रात्याक्षिक आणि दोन तास मार्गदर्शन, असे एकूण चार तास प्रशिक्षण होणार आहे.
लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे. संपूर्ण प्रशिक्षणात १५ मोड्यूल्स असणार आहेत. आरोग्य मित्र हा ‘कम्युनिटी रिसोर्स पर्सन’ म्हणून तयार केला जाणार आहे. पहिल्या, बॅचमध्ये वीस प्रशिक्षणार्थी आहेत. प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यांचा आहे. प्रशिक्षणासाठी कोणतीही फी घेण्यात आली नाही. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून या अभिनव उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे समाजात सेवाभाववृद्धी वाढीस लागणार आहे.
लोकमान्य हॉस्पिटल्सचे डॉ. जयंत श्रीखंडे यांनी प्रथमोपचार या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. दिलीप कानडे यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. डाॅ. श्रीकृष्ण जोशी यांनी मार्गदर्शन केले.











