न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी २१ लाख १० हजार ९७१ रुपयांचा खर्च प्रचारासाठी केला आहे. मतदारसंघात त्यांचा हा खर्च सर्वात जास्त आहे. तर, दुस-या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार असून, त्यांनी १४ लाख ९२ हजार ६४६ रुपयांचा खर्च प्रचारावर केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील २१ उमेदवारांचा प्रचारांचा खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडून नुकताच तपासण्यात आला. त्यात ही बाब समोर आली आहे. प्रचाराच्या हिशेबाच्या तिस-या टप्प्यात २७ एप्रिलपर्यंतचा खर्चाचा हिशेब तपासण्यात आला आहे. त्यात प्रथमच सर्व २१ उमेदवारांनी आपला खर्च मुदतीमध्ये सादर केला होता.
दुस-या टप्प्यापर्यंत राष्ट्रवादीचे पवार आघाडीवर होते. त्यानंतर शिवसेनेच्या बारणे यांनी प्रचार खर्चात वाढ करून आघाडी घेतल्याचे हिशेब तपासणीवरून स्पष्ट होत आहे. एका उमेदवारास ७० लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे. खर्चाचा अंतिम हिशेब निकाल लागल्यानंतर १५ दिवसानंतर केली जाणार आहे . त्यावरून खर्चाची अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे. ही तपासणी जिल्हा निवडणूक कार्यालयात केली जाणार आहे.















