न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १३ मे २०१९) :- सासरच्या जाचाला कंटाळून एका महिला डॉक्टरने मुंग्या मारण्याची पावडर खाल्ली. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये जखमी झालेल्या डॉक्टरचा रविवारी (दि. १२) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डॉक्टर असलेल्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास उद्योगनगर, चिंचवड येथे घडली होती.
योगिता चौधरी (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती चेतन गोविंद चौधरी, सासू रजनी गोविंद चौधरी, सासरे गोविंद चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता आणि चेतन दोघेही डॉक्टर आहेत. योगिता आणि आरोपी यांची किरकोळ कारणावरून भांडणे होत असत. आरोपींनी योगिता यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी योगिता यांना समज देवून सोडले होते. त्यामुळे तणावामध्ये असलेल्या योगिता यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मुंग्या मारण्याची पावडर खाल्ली. त्यामुळे त्यांच्या पोटात मळमळ होऊ लागली.
योगिता यांनी याबाबत चेतनला फोनवर सांगितले, चेतनने घरी येऊन पुन्हा त्यांना मारहाण केली. यावेळी दोघांनीही अंगावर रॉकेल ओतून घेतले. चेतनच्या हातामध्ये असलेली काडीपेटी घेऊन योगिता यांनी स्वत:ला पेटवन घेतले. योगिताला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.















