- सलग तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत भोसरी मतदारसंघात रचला नवा इतिहास..
- माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जावू देणार नाही – आ. लांडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२४) :- भोसरीत मतदारसंघातील पैलवान म्हणून प्रख्यात असलेले आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा मैदान गाजवले आहे. जवळपास ६४ हजार मतांच्या मताधिक्क्याने ते विजयी झाले आहेत. आमदार म्हणून भोसरीकरांनी महेश लांडगे यांच्या भूमिकेला आणि विकासकामाला आपल्या मतांद्वारे भक्कम पाठिंबा दिला. सलग तीनदा विजयी होत आमदार लांडगे यांनी भोसरी मतदारसंघात एक नवा इतिहास रचला आहे.
सलग तिसऱ्यांदा जनतेसमोर जात असताना विरोधकांकडून भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना आरोपांचा अक्षरशः भडीमार सहन करावा लागला. भाजपचा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर आलेले महेश लांडगे विरोधकांच्या विशेष निशान्यावर होते. गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार म्हणून महेश लांडगे यांनी केलेल्या प्रत्येक विकासकामावर आरोप होत होते. या आरोपांना उत्तर देत महेश लांडगे यांनी आपला प्रचार सुरूच ठेवला. या मतदारसंघात कोण विजय होईल, याचे भाकित करणे राजकीय जाणकारांसाठी अवघड झाले होते. परंतु महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भोसरीकरांनी आमदार लांडगेंचा विजय निश्चित केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून यंदा बदल घडेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु आमदार लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. त्यांनी केलेल्या कामाची माहिती घराघरात पोहचविली. भोसरीच्या मतदारांनी देखील आमदार लांडगे यांनी दहा वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती विजयाच्या रुपात दिली.
ऐन निवडणुकीच्या काळात माजी नगरसेवक पक्ष सोडून जात होते. परंतु महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी मात्र साथ सोडली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी आपली ताकद झोकत विजय खेचून आणला.
सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांचे त्रिवार आभार…!
देव-देश अन् धर्माभिमान जागृत ठेऊन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या निमित्ताने सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी तिसऱ्यांना आपले प्रतिनिधीत्व विधानसभा सभागृहात करण्याची संधी दिली. याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. विधानसभा निवडणुकीची ‘हॅट्रिक’ करण्यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून अविरत कष्ट करणारे माझे सर्व सहकारी, भाजपा परिवार आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, हिंतचिंतक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जावू देणार नाही, असा ‘शब्द’ देतो.
आ. महेश लांडगे…
















