- बनसोडे यांच्यावर सुरुवातीला आमची नाराजी – चंद्रकांता सोनकांबळे..
- भोसरीत आ. महेश लांडगे यांना प्रचारादरम्यान विरोधकांकडून त्रास – आ. उमा खापरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा सकारात्मक निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय या महायुतीतील घटक पक्षांनी जल्लोष केला. त्यानंतर महायुतीच्या वतीने पिंपरीतील आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधण्यात आला.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल, भाजपच्या आ. उमा खापरे, सदाशिव खाडे, मा. खा. अमर साबळे, मंगला कदम, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, युवा नेते अतिश बारणे, शिवसेनेचे निलेश तरस आदी उपस्थित होते.
योगेश बहल म्हणाले, महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विरोधी पक्षांनी निवडणुकीत काहीतरी वेगळच चित्र निर्माण केलं होत. घासून होईल अशा वल्गना केल्या जात होत्या. मात्र, लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, महिला वर्ग, नोकरवर्ग आदींसाठी धाडसी निर्णय घेतले. राज्याला विकासाच्या बाबतीत एक नंबरवर नेले. त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरातदेखील जगताप, बनसोडे आणि लांडगे यांना तिसऱ्यांदा बहुमताने लोकांनी निवडून आणले. पिंपरीत मतदानाचा टक्का कमी झाल्यामुळे अण्णा बनसोडे यांचं मताधिक्क्य कमी झाले. आरपीआयला दिलेला शब्द आमच्या लक्षात आहे.
सोनकांबळे म्हणाल्या, मोठ यश मिळाल्यामुळे निश्चित आता आमच्यावर मोठी जबाबदारी वाढली आहे. मविआकडून अनेक योजनांवर टीकाटिपण्णी झाली. त्यांनी अनेक पर्याय दिले. परंतु, जनतेला ते रुचले नाहीत. आमच्या चारही पक्षांनी एकदिलाने काम केले. आ. बनसोडे यांच्यावर सुरुवातीला आमची नाराजी होती, परंतु, त्यांनी यापुढे कामाची हमी दिली आहे.
उमा खापरे म्हणाल्या, फेक नेरेटीव्ह मतदारांच्या लक्षात आला. भोसरीत आ. महेश लांडगे यांना प्रचारादरम्यान विरोधकांकडून त्रास झाला. तरीही आमच्या पक्षाची फळी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी राहिली. ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला धरून महायुती एकत्र राहिली. त्यामुळेच आज आम्हाला यश मिळाले.
अमर साबळे म्हणाले, संविधान बदलण्याच्या फेक नेरेटीव्हचा मतदारांनी या निवडणुकीत एनकाउंटर केला. विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला. महायुती अभेद्य राहिली. तोच आदर्श आता पिंपरी चिंचवड शहरात राहील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात ‘एक है तो सेफ है’ हा पायंडा पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू.
















