न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- कोट्यवधींचा निधी मिळत असूनही, कामगार व त्याच्या कुटुंबियांना कर्मचारी विमा योजनेचा फारसा उपयोग होत नाही. कामगारांना अद्यापही सक्षम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. या विरोधात आंदोनलाचा इशारा पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळाने दिला आहे.
याबाबत मंडळाचे अध्यक्ष गोविंद पानसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोहननगर येथे ईएसआय रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयात आधुनिक साधने नाहीत. त्यामुळे उपचारांसाठी या रुग्णालयाकडून अन्य खासगी रुग्णालयामध्ये रूग्ण पाठविले जातात.
ईएसआय नोंदणीकृत डॉक्टरांना वेतन कमी असल्याने अनेक डॉक्टर या सेवेचा राजीनामा देत आहेत. परिणामी कार्डधारक कामगारांना आरोग्य सुविधा मिळविता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ईएसआय हॉस्पिटलमधील कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पानसरे यांनी दिला आहे.















