न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२४) :- संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यानिमित्त कार्तिकी एकादशी दिनांक २६/११/२०२४ रोजी श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहू येथे ह भ प वैजनाथ महाराज गरड यांचा काव्यमित्र पुणे या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती पर्यावरण अभ्यासक व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील, काव्यमित्र चे अध्यक्ष राजेंद्र सगर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक नरेंद्र चऱ्हाटे ,हभप नरहरी महाराज भिलजकर, आयोजक पांडुरंग गलबे यांची होती.
“एकविसाव्या शतकातही महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धेमुळे व अज्ञानामुळे अनेकांचा बळी गेल्याचे आपण ऐकत व पहात असतो. वारकरी कीर्तनकार अनेक वर्षापासून हे अज्ञान व अंधश्रद्धा मिटवण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे.राज्यातील बहुतांशी कीर्तनकार संतांच्या ओव्यांचा संदर्भ देऊन जनतेतील अज्ञान हटविण्याचे कार्य करीत आहेत.तरुणांना कीर्तनातून दिशा दिल्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल बनत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भंडारा डोंगरावर सतत १७ वर्ष सातत्याने कीर्तन सोहळ्याचे नियोजन करणे कौतुकास्पद नक्कीच आहे “असे सन्मान कार्यक्रम प्रसंगी डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले. कार्यक्रमात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हभप वैजनाथ महाराज गरड यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना हभप वैजनाथ महाराज म्हणाले,” एकादशीचे खरे महत्व संत नामदेव महाराजांनी जनतेला समजून सांगितले आहे.इतर मिष्टान्न वगळता अन्न वर्ज्य करून व्रताचे पालन करणे म्हणजेच शरीर शुद्धी करणे होय.या दिवशी भगवंत नामाचा जप जपणे आत्मशुद्धीसाठी महत्वाचे ठरते.अज्ञान नष्ट होण्यास त्यामुळे सुरुवात होते. उद्योजक नरेंद्र चऱ्हाटे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. सोहळ्याचे आयोजन पांडुरंग गलबे यांनी केले.












