न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- शहरात विविध भागांमध्ये पवना नदीपात्रात थेट मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सह-शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.
निकम म्हणाले, बोपखेल येथे प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी मैलाशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. पिंपळेनिलख येथे २१ दशलक्ष लिटर इतकी मैलाशुद्धीकरण केंद्राची क्षमता आहे. तिथे आणखी २० दशलक्ष लिटर क्षमतेचा मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.
थेरगाव, किवळे येथील नाले अडवून सांडपाणी नलिकेला जोडले आहे. ज्या भागामध्ये सांडपाणी मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये नेणे शक्य नाही तिथे नाल्यातील सांडपाणी संबंधित नाल्याच्या ठिकाणीच प्रक्रिया करून नदीत सोडण्याचे नियोजन आहे. चिखली येथील नाल्यासह अन्य एका नाल्याबाबत हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. थेरगाव येथे मासे मृत पावल्याच्या घटनेनंतर संबंधित ठिकाणी चेंबरची दुरुस्ती केली. तसेच, सांडपाणी नलिकेतून होणारी गळती काढल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आहे.
शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने, नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या नदी प्रदूषणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने २७ फेब्रुवारीला महापालिका आयुक्तांवर फौजदारी स्वरूपाची कारवाईची व कारणे दाखवा नोटीस बजावली होती.















