पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- झी मराठी वाहिनीवरून प्रक्षेपित होणा-या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील आक्षेपार्ह दृश्यामुळे कोकणची बदनामी होत आहे. त्यामुळे यापुढे याबाबत काळजी घ्यावी अन्यथा ही मालिका बंद करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाने केली आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रात्रीस खेळ चाले या मालिकेत दाखविण्यात येत असलेल्या प्रसंगांमुळे कोकणी माणसाकडे संशयाने पाहिले जात आहे. तसेच कोकणची बदनामी होत आहे. मालिकेमुळे जनतेत चुकीचा संदेश ही जात आहे. चुकीच्या चित्रणाबाबत निर्मात्यांनी पुढील आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करावी तसेच यापुढे आक्षेपार्ह विषय टाळावेत अन्यथा मालिका बंद करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केली आहे.















