- पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने वाढदिवसानिमित वृक्षारोपण
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- एस. एम. देशमुख हे पत्रकारांच्या राज्यातलं एक अनोखं रसायन. संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्र राज्यातही ‘पत्रकारिता’ या क्षेत्रात भांडवलधार्जिणे मालक मंडळींनी आपले बस्तान बसवलं आहे. त्यामुळे पत्रकारिता हे एक सामाजिक चळवळीचे केंद्र न राहता, फॅक्टरीतल्या उत्पादन क्षेत्रातील वस्तूंप्रमाणे तिचे ठरविक बाजारमूल्य ठरवले जात आहे. तेही उद्योगपतींनी ठरवलेल्या धोरणांनुसारच.
संस्थांच्या अशा धोरणांमुळे प्रामाणिक पत्रकारांची कुचंबणा होते. पर्यायाने त्यांना व्यवस्थेपुढे एक तर गुडघे टेकावे लागतात अन्यथा संघर्ष करावा लागतो. या संघर्षातूनच एक नवा तारा एस. एम. देशमुख यांच्या रूपाने पत्रकारिता क्षेत्रात उदयास आला. एवढी मोठी प्रस्तावना देण्याचे कारण म्हणजे आज त्यांचा वाढदिवस.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त या नात्याने देशमुख सरांनी राज्यभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ज्यात प्रिंट मिडिया असो की ऑनलाईन मिडिया असो त्यांच्यासाठी त्यांनी राज्यपातळीवर काम केले. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ते स्वतः रस्त्यावर आले. प्रसंगी त्यांना विविध आंदोलने करावी लागली. त्यासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांना एकत्र आणले. त्यांच्यात एकजूट निर्माण केली व पत्रकारांची ताकद वेळोवेळी शासनाला दाखवून दिली.
अशा या दृष्ट्या पत्रकाराच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आज सोमवार (दि. १३) रोजी पिंपरीतील उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश हुंबे, कार्याध्यक्ष अनिल वडघुले, सरचिटणीस संजय बोरा, प्रसिद्धीप्रमुख दादाराव आढाव, ज्येष्ठ सदस्य मदन जोशी, जावेद फारास आदी पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते.















