न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करण्यासंदर्भात लेखी पत्र दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ‘स्मार्ट सिटी’, ‘पॅन सिटी’ आणि आता ‘मेट्रो’ सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात यावी. मात्र ‘नेमेची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवर सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक पावसाळ्यात दिसून येते. परिसरातील नाल्यांचे कॉँक्रीटीकरण झाले असले, तरी नाल्यांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नाल्यात कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा होत आहे. नाल्यात अधिक प्रमाणात प्लॅस्टिक असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. तसेच या नाल्यात सांडपाणी सोडण्यात येते़. त्यामुळे येथे पाणी साचून दुर्गंधी येते. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्वरित रहाटणी-पिंपळे सौदागर मधील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करून घेण्यात यावी, असे काटे यांनी या पत्रात म्हटले आहे.















