- गाळेधारकांना मिळेनात सुविधा; मेंटेनन्सचे पैसे परत देण्याची होतेय मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर ३० येथील कन्व्हेनियंस शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी गाळेधारकांना शुल्क आकारण्यात आले, परंतु, मागील एक वर्षात देखभाल दुरुस्तीसह कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. यामुळे गाळेधारकांनी पीएमआरडीएवर नाराजी व्यक्त करत प्रतिगाळा जमा केलेले देखभाल दुरुस्ती शुल्क परत घेण्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला आहे.
वाल्हेकरवाडी (चिंतामणी चौक ) सेक्टर ३० येथे कन्व्हेनियंस शॉपिंग सेंटर विकसित करण्यात आले असून त्यातील ३१ गाळ्यांचा ताबा मागील वर्षी देण्यात आला. शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या दैनंदीन देखभाल दुरुस्तीसह गाळेधारकांना तत्सम सुविधा देण्यासाठी प्रती गाळा ६४ हजार ५०० इतके शुल्क यानुसार एकुण १९ लाख ९९ हजार रूपये आकारण्यात आले. या कामासाठी गाळेधारक आणि पीएमआरडीए यांच्यात कायदेशीर करार झाला. शुल्क जमा करुन दहा ते अकरा महिने उलटले तरी पीएमआरडीएकडून कसल्याही सुविधा पुरवल्या नसल्याची तक्रार गाळेधारकांनी केली आहे.
शॉपींग सेंटरमधील विद्युत वापराचे कॉमन वीज बिल महावितरण कार्यालयात जमा केले नाही. परिणामी, महावितरणकडून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विद्युत प्रवाह खंडित केला आहे. सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया करुन देण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप ती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. गाळेधारकांच्या मालमतेची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणीव कर संकलन विभागाकडे नोंद केलेली नाही. शॉपिंग सेंटरमध्ये हक्काचे नळ कनेक्शन नाही. त्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार केलेला नाही. ऑन ग्रीड मीटर नसल्यामुळे सोलर यंत्रणा कार्यारत नाही. लिफ्टसाठी बँकअप बॅटरी उपलब्ध नाही. प्रत्येक मजल्यावर बाल्कनीमध्ये पाणी साचते. परिणामी, दुकानांमध्ये पाणी शिरत असून त्याचा गाळाधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छतागृहातील नळ व इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. वारंवार कळवूनही त्याठिकाणी नवीन वस्तू बसविण्यात आलेल्या नाहीत. देखभाल दुरुस्ती अभावी स्वच्छतागृहांची अशी अवस्था झाली आहे. शेजारी काम सुरु असलेल्या एलोरा कन्स्ट्रक्शन यांनी त्यांच्या कामासाठी इमारतीच्या परिसरातील इंटरलॉक ब्लॉक्स व रॅम्प काढले आहे. काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी हे ब्लॉक्स व्यवस्थित बसविले नाहीत. परिसरात मोठे खट्टे पडले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी पीएमआरडीए प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी जमा केलेले शुल्क परत करावेत, अशी मागणी करत गाळेधारकांनी अर्ज केला आहे.
गाळेधारक गणेश जाधव, विजय लंके, वरुण पोकळे, मोहिनी भोंडवे, स्वप्नील शिराळ, स्वप्नील भालेकर, सुयोग चोपडा, मच्छिंद्र कुमारत, योगेश बेलदार, सुहास मवाळ, रितेश भावसार, शैलेश हंडी आदींनी शुल्क परत करण्याची मागणी केली आहे.
गाळेधारकांची एकत्रित सोसायटी स्थापन झाल्यानंतर गाळेधारकांनी देखभाल दुरुस्तीसाठी भरलेले शूल्क सोसायटीच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन पीएमआरडीएच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यावर समस्या सोडविण्याबाबत कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली. लवकरात लवकर आपल्या सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले, या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला. परंतु, आमचा भ्रमनिरास झाला, अशा शब्दांत गाळेधारकांनी पीएमआरडीएवर नाराजी व्यक्त केली.
”विधानसभेच्या आचारसंहितेमुळे सोसायटी फर्म होण्यास विलंब झाला आहे. आता त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विजेचे बिल सोसायटीधारकांनी भरायचे आहे. एसटीपी, क्लब हाउस, स्ट्रीट लाईट याची बिल सोसायटी धारकांच्या मेंटेनन्समधून भरली जातात. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नवीन निविदा काढणार आहे.” – मा. रश्मी पाटील, उपअभियंता – पीएमआरडीए...











