न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२४) :- न्यायालयाच्या आदेशाने घराचा ताबा घेण्यासाठी आलेल्या वकील, पोलिस आणि फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. घर मालक आणि घरातील सदस्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दापोडी येथील मोरेश्वर रेसिडेन्सी येथे बुधवारी (दि. ११) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
अनिल भंडाराम चौधरी (वय २५), कमला अनिल चौधरी (२८), भंडाराम जोधाराम चौधरी (४९), पालीदेवी भंडाराम चौधरी (४०, चौघे रा. दापोडी), मकरंद शंकरदेव (४८, रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विशाल व्यंकटराव मनाळे (२९, रा. पुणे) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांच्या घराचे हप्ते थकल्याने एल अँड टी फायनान्स कंपनीने न्यायालयाकडून घराचा ताबा घेण्याचा आदेश घेतला. त्यानुसार वकील विशाल मनाळे, कंपनीचे अधिकारी, पोलिस हे कॅमेऱ्याच्या निगराणीत ताबा घेण्याची कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी संशयितांनी मनाळे, कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांच्या अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.