न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२४) :- शिवाजीनगर न्यायालयासमोर असलेल्या खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर स्फोट झाला. यामध्ये वाकड पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंमलदाराची भेट घेत विचारपूस केली. निलेश सुभाष दरेकर, असे जखमी अंमलदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार दरेकर हे गुरुवारी (दि. १२) शिवाजीनगर कोर्ट येथे कर्तव्य होते. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी कोर्टासमोरील एका हातगाडी जवळ गेले. त्यावेळी अचानक स्फोट झाला. यामध्ये दरेकर यांच्यासह अन्य दोघेजण भाजले.
याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे, वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातून घरी सोडल्याचे कळताच घरी जाऊन विचारपूस केली.
जखमी निलेश दरेकर यांनी सांगितले की, शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर चहा पिण्यासाठी गेलो असताना अचानक कशाचा तरी स्फोट झाला. यामध्ये माझे हात आणि चेहऱ्याला भाजले. याबाबत माहिती मिळताच सहकाऱ्यांनी काळजीने मला फोन केले. तसेच, वरिष्ठ अधिकारी देखील हातातील कामे सोडून माझ्याकडे आले. सर्वांनी घेतलेल्या या काळजीमुळे मी भारावून गेलो आहे. अंमलदार जखमी झाल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी इतर अधिकाऱ्यांना फोन करून चौकशी केली व काळजी घेण्याच्या सूचना केल्या.