न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१६ डिसेंबर २०२४ ) :- सूस येथील तीर्थ फिल्डस येथे ‘एन एच ७ या म्युझिक फेस्टिव्हल परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परवानगी नाकारली आहे.
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस येथे १४ व १५ डिसेंबर रोजी नाँडविन गेमिंग यांच्यातर्फे आयोजित ‘एन एच ७ वीकएन्डर’ या म्युझिकल फेस्टिव्हलसाठी आयोजक गिरीश शिंदे यांनी परवानगी मागितली होती. त्यांना दोन महिन्यांपूर्वी बावधन पोलिस ठाणे व परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून परवानगी देता येणार नसल्याचे कळविले होते. या ठिकाणी रहिवासी भाग आहे. ज्येष्ठ नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणारे वास्तव्यास आहेत. मुंबई-बंगळुरू महामार्गापासून ते सूस येथील तीर्थ फिल्डसपर्यंत एकेरी वाहतूक आहे. यापूर्वी अशा कार्यक्रमावेळी वाहतूक कोंडी झाली होती. कार्यक्रम उंचावर असल्याने व बाजुच्या रहिवासी भागात लाउडस्पिकरचा आवाज व एलईडी लाईटमुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण झाला होता. त्यामुळे परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांनी कळविले आहे.
आयोजकांनी कार्यक्रमाचे ठिकाण घोषित करण्यापूर्वी पोलिस विभागाशी समन्वय साधावा. त्यानंतर परवानगी घेऊनच कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित करावे.
पोलिस प्रशासन योग्य ते कायदेशीर सहकार्य करील, असे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पत्रकात म्हटले आहे.
















